The Eid Milan Gathering : सामाजिक एकात्मिकतेचा संदेश देणारा पवित्र रमजान ईद हा सण, त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने ईद– स्नेह मिलन कार्यक्रम येथील पत्रकार भवन परिसरात ३० मार्च रोजी सायंकाळी पार पडला.

‘बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने बंधुभाव जोपासला’
बुलढाणा : सामाजिक एकात्मिकतेचा संदेश देणारा पवित्र रमजान ईद हा सण, त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने ईद– स्नेह मिलन कार्यक्रम येथील पत्रकार भवन परिसरात ३० मार्च रोजी सायंकाळी पार पडला. बुलढाणा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून, आपले विचार मांडले. यामध्ये, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने बंधुभाव जोपासल्याचे गौरवोउद्गार मान्यवरांनी काढले.

सर्वप्रथम, हाफिज मुजाहिद यांनी पत्रकार संघाच्या आयोजनाचे कौतुक केले. आजचा काळ आव्हानांचा काळ असल्याचे सांगत जातीय द्वेष पसरत असताना राष्ट्रासाठी सर्व समाज संघटित करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे त्यांनी सांगितले. रमजान महिन्यात रोजा अर्थात उपवास का महत्वाचा असतो, या संदर्भात हरून सर यांनी माहिती दिली. शहराच्या सांस्कृतिक चळवळीत योगदान देणाऱ्या डॉ. वैशाली निकम यांनी पत्रकार संघाने आतापर्यंत आयोजित केलेल्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा उल्लेख केला. दरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व न प च्या मुख्याधिकारी गणेश पांडे, सागर पवार उपनिबंधक यांनीही भेट देवून सदिच्छा दिल्या. रणजीतसिंग राजपूत यांची जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार संघटित झाले आहेत, एवढेच नव्हे तर महापुरुषांची जयंती असो की एखादा सण, वेळोवेळी सुंदर कार्यक्रमांचे आयोजन करून पत्रकारांची प्रतिभा उज्वल करण्याचे काम रणजीतसिंग राजपूत यांनी केले आहे, असे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय साहित्यिक, उर्दू भाषेचे अभ्यासक डॉ. गणेश गायकवाड यांनी आपल्या काव्यातून विश्वबंधुत्वाची भावना सादर केली. तद्वतच प्रा. डी. आर. माळी, डॉ. आशिष खासबागे, राजश्री शाहू परिवाराच्या मालतीताई शेळके, शिवसाई परिवाराचे डी. एस. लहाने, डॉ. लताताई बाहेकर, हारून मास्टर, प्रा. अनिल रिंढे, मिलिंद वानखेडे, वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी स्मिता म्हसाये, विधीज्ञ ऍड. किरण राठोड मॅडम, सामाजिक कार्यकर्ते मो. सोफियान यांनी देखील मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे, बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी आपल्या सुंदर आवाजातून गीत गाऊन मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी शीरखुर्माचा आनंद घेतला. पत्रकार संघाचे विभागीय संघटक रहेमत अली यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सूत्रसंचालन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केले. याप्रसंगी पत्रकार राजेश डिडोळकर, नितीन सिरसाट, ब्राह्मानंद जाधव, कासीम शेख, वासिम शेख, शिवाजी मामनकर, युवराज वाघ, रहेमत अली, अजय काकडे, अभिषेक वरपे तसेच या कार्यक्रमाला अब्दुल रहीम सेठ,अब्दुल जाक्रिया, अब्दुल राजीक, अब्दुल रेहान यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाहेबाज शाह, कदीर कुरेशी, मुजफ्फार शाह, शेख महेबूब, तोफीक शाह, अदनान खान यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


