Melee at ‘Palam Sunday’ Event : जालना शहरातील वाल्मीक नगर परिसरातील ख्रिस्ती कॅम्प येथे पालम संडे निमित्त आयोजित कार्यक्रमात रविवार, 29 मार्च रात्री उशिरा तणाव निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या घटनेत प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक संजय पाखरे यांच्यासह एकूण सहा ते सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाल्मीक नगर ख्रिस्ती कॅम्पमध्ये घुसखोरीनंतर वाद पेटला; पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप, हल्लेखोरांचा शोध सुरू
जालना : शहरातील वाल्मीक नगर परिसरातील ख्रिस्ती कॅम्प येथे पालम संडे निमित्त आयोजित कार्यक्रमात रविवार, 29 मार्च रात्री उशिरा तणाव निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या घटनेत प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक संजय पाखरे यांच्यासह एकूण सहा ते सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ख्रिस्ती समाजातील ४० दिवसांच्या उपवासाची सांगता म्हणून पालम संडे निमित्त रविवारी या ठिकाणी विशेष धार्मिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत सुरू असतानाच इतर भागातील काही तरुणांनी अचानक प्रवेश केल्याने वादाला सुरुवात झाली. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद काही वेळातच तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.
या घटनेत नगरसेवक संजय पाखरे, संदीप भालेराव, संजय हिरे, आदेश गायकवाड, अभिजीत कसबे यांच्यासह अन्य दोन ते तीन जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, ही बातमी शहरभर पसरल्यानंतर रुग्णालयात ख्रिस्ती समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संभाव्य तणाव टाळण्यासाठी कदीम जालना पोलिसांनीही रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवून जमाव पांगवला.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.


