Mobile Passport Van Service in Washim : जिल्ह्यातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पासपोर्ट सुविधेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, २१ एप्रिलपासून वाशिम येथे पासपोर्टसाठी चल वाहन सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार संजय देशमुख यांनी दिली.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पासपोर्ट सुविधेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, २१ एप्रिलपासून वाशिम येथे पासपोर्टसाठी चल वाहन सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार संजय देशमुख यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना पासपोर्टसंबंधित कामांसाठी हिंगोली, अकोला किंवा अमरावती येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन खासदार संजय देशमुख यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. तसेच नागपूर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार व दूरध्वनीद्वारे संपर्क ठेवण्यात आला. याशिवाय लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करून जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, आता पासपोर्टसंबंधित ओळख पडताळणी व नूतनीकरण प्रक्रिया वाशिममध्येच मोबाईल व्हॅनद्वारे पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अनुप्रयोगाद्वारे वाशिम या ठिकाणासाठी आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन खासदार देशमुख यांनी केले आहे.


