Ambulance stopped on Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरून ठाणे येथून नांदेडकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पोलिसांनी जालना येथील टोल नाक्यावर अडवून तपासणी केली असता एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

ठाणे–नांदेड प्रवासादरम्यान जालना टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई
जालना : समृद्धी महामार्गावरून ठाणे येथून नांदेडकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पोलिसांनी जालना येथील टोल नाक्यावर अडवून तपासणी केली असता एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी, 28 मार्च रोजी सकाळी याबाबत अधिकृत माहिती समोर आली.
पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका जालना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात हलवली. मृत तरुणाचे नाव विजय विकास थोरात (वय अंदाजे 35) असे असून तो ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरातील रहिवासी होता. त्याचे आईवडील, बहीण आणि लहान भाऊ हे कुटुंबीय मृतदेह नांदेड येथील गावी घेऊन जात होते.
मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय थोरात हा मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याचा एक डोळा निकामी होता तसेच अर्धांगवायूचा त्रासही होता. त्याला मद्याचे व्यसन असल्याचेही समोर आले आहे. 26 मार्च रोजी गुरुवारी रात्री तो घराबाहेर झोपलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास आईने उठवण्यासाठी गेल्यावर तो मृत अवस्थेत आढळून आला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना न कळवता थेट रुग्णवाहिकेतून मृतदेह नांदेडकडे नेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ठाणे येथील शेजाऱ्यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कासार वडवली पोलिसांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करत समृद्धी महामार्ग पोलिसांच्या मदतीने जालना टोल नाक्यावर ती अडवली.
सध्या मृतदेह जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असून शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, याबाबतचा अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवाल आणि पुढील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


