dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आशिया कपमध्ये तेजल साळवेची अचूक कमान; कांस्यपदकासह देशाचा मान उंचावला | Tejal Salve’s Precise Archery at the Asian Cup

Tejal Salve’s Precise Archery at the Asian Cup : जालना शहरातील आंतरराष्ट्रीय तिरंदाज तेजल राजेंद्र साळवे हिने थायलंडमधील बँकॉक येथे सुरू असलेल्या आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत (स्टेज-१) उल्लेखनीय कामगिरी करत कंपाउंड महिला गटात कांस्यपदक पटकावले आहे. 

बँकॉक येथे पार पडलेल्या स्पर्धेत वैयक्तिक कांस्य, तर भारतीय महिला संघाला रौप्यपदक

विनोद काळे / जालना :  जालना शहरातील आंतरराष्ट्रीय तिरंदाज तेजल राजेंद्र साळवे हिने थायलंडमधील बँकॉक येथे सुरू असलेल्या आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत (स्टेज-१) उल्लेखनीय कामगिरी करत कंपाउंड महिला गटात कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे भारताचा मान उंचावला असून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

या स्पर्धेत तेजलने अत्यंत अचूकता आणि मानसिक स्थैर्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. कांस्यपदकाच्या सामन्यात तिने निर्णायक क्षणी अचूक बाण सोडत विजय आपल्या नावावर केला. तिच्या या कामगिरीने पुन्हा एकदा भारतीय तिरंदाजीची ताकद अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्पर्धेत भारतीय महिला कंपाउंड संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. तेजल साळवे, चिकिथा तानिपार्थी आणि राज कौर या त्रिकुटाने शानदार समन्वय आणि संघभावनेच्या जोरावर अंतिम फेरी गाठत देशासाठी महत्त्वाचे पदक जिंकले.

तेजलच्या सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि समर्पणामुळे ती आज या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिच्या यशामागे प्रशिक्षक प्रकाश दुसेजा, लोकेश चंद पाल आणि चंद्रकांत एलाग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचेही तिला भक्कम पाठबळ मिळाले.

तिच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी अधिकाधिक पदके जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

कालिका स्टील प्रायोजक

जालना येथील कालिका स्टील कंपनीने तिच्या प्रायोजकत्वाची जबाबदारी स्वीकारली असून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही स्पर्धेपूर्वी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

स्पर्धेचे वैशिष्ट्य

स्पर्धा : आशिया कप तिरंदाजी स्पर्धा (स्टेज-१), बँकॉक

खेळाडू : तेजल  साळवे (जालना)

गट : कंपाउंड महिला

वैयक्तिक कामगिरी : कांस्यपदक

संघ कामगिरी : भारतीय महिला संघाला रौप्यपदक

प्रशिक्षक : प्रकाश दुसेजा, लोकेश चंद पाल, चंद्रकांत एलाग

प्रायोजक : कालिका स्टील, जालना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top