dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जय श्रीराम-जय सेवालालच्या जयघोषाने दुमदुमली पोहरादेवी नगरी | Ram Navami Festival

Ram Navami Festival : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथे २६ मार्च रोजी रामनवमीचा महोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

Ram Navami Festival
मानोरा : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथे २६ मार्च रोजी रामनवमीचा महोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. जय श्रीराम, जय सेवालाल आणि जय रामराव बापू यांच्या जयघोषाने संपूर्ण पोहरादेवी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
देवी जगदंबा माता मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर आणि संत रामराव बापू सेवा आश्रमात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडले. दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मसोहळा पाळणा गीत, भोग भंडारा, आरदास आणि महाआरतीने साजरा करण्यात आला. लाखो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडताच परिसरात उत्साहाची लाट उसळली. या सोहळ्यात महंत कबीरदास महाराज यांच्या हस्ते मंदिरात तर संत डॉ. रामराव बापू सेवा आश्रमात धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज व शेखर महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधी संपन्न झाले. भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने दर्शन घेत जयघोषात सहभाग नोंदवला. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी यात्रा महोत्सवानिमित्त देशभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आदी राज्यांतील लाखो भाविक पोहरादेवीत दाखल झाले. नांदेड, परभणी, जालना, मंठा आदी भागांतून हजारो भाविक पायदळ दिंडीद्वारे येथे पोहोचले होते. मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. अनेक भाविकांनी नवस फेडत शेतात, झाडाखाली व उपलब्ध जागी धार्मिक विधी पार पाडले.

प्रशासनाच्या सुविधांमुळे भाविकांना दिलासा

यात्रा महोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध स्वयंसेवी संस्थांनी अन्नदानाचे आयोजन करून भाविकांची सेवा केली.

मंत्री संजय राठोड यांनी घेतले देवी-संतांचे दर्शन

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह तेलंगणा व कर्नाटकातील आजी-माजी मंत्री आणि इतर मान्यवरांनी महोत्सवाला उपस्थिती लावून देवी जगदंबा माता व संतांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top