जालन्यात खळबळ : संत गजानन हॉस्पिटलमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू ; नाईट ड्युटीला गेलेल्या कर्मचाऱ्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; आत्महत्या की घातपात?

जालना :  शहरातील संत गजानन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवार, 15 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. हॉस्पिटलच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली असून हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

जालना :  शहरातील संत गजानन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवार, 15 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. हॉस्पिटलच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली असून हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

       अमोल राजेंद्र दोडके (वय अंदाजे 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो संत गजानन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर विभागात कार्यरत होता. ऑपरेशन थिएटरमधील कामाचा त्याला सुमारे १५ वर्षांचा अनुभव होता. गेल्या महिन्यापासून तो या हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागात काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल दोडके हा शनिवार, 14 मार्च रोजी नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद लागत असल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. नाईट शिफ्टमुळे उशीर झाला असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी सुरुवातीला व्यक्त केला होता.

मात्र सकाळपर्यंत कोणताही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी हॉस्पिटलच्या परिसरात फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात अमोल दोडके याचा मृतदेह आढळून आला. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाकडून घटनेबाबत स्पष्ट माहिती देण्यात न आल्याने कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

या संशयास्पद मृत्यूमुळे शहरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, हॉस्पिटलमधील जबाबदार डॉक्टरांशी संपर्क होत नसून ते घटनेनंतर रुग्णालयातून पळून गेल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. 

घटनेचा तपास सुरू आहे

या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. सध्या हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

» अनंत कुलकर्णी,

उपविभागीय पोलिस अधिकारी, जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »