ढाका : बांगलादेशच्या राजकारणात मंगळवारी एका नव्या युगाची सुरुवात झाली. तब्बल २० वर्षांच्या वनवासानंतर बांगलादेश नॅशनल पार्टी पुन्हा एकदा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे.

ढाका : बांगलादेशच्या राजकारणात मंगळवारी एका नव्या युगाची सुरुवात झाली. तब्बल २० वर्षांच्या वनवासानंतर बांगलादेश नॅशनल पार्टी पुन्हा एकदा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यासोबतच ५० सदस्यीय मंत्रिमंडळही अस्तित्वात आले असून, यामध्ये ४१ नवीन चेहऱ्यांना संधी देऊन रहमान यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीने यश संपादन केले. ३०० जागांपैकी एकट्या बीएनपीने २०९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर त्यांच्या मित्रपक्षांना ३ जागा मिळाल्या. ढाका येथील राष्ट्रीय संसदेच्या साउथ प्लाझा येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात तारिक रहमान यांच्यासोबत २५ कॅबिनेट मंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळात तीन तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश करून कारभारात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न रहमान यांनी केला आहे.
शपथ घेताच ‘जुलै चार्टर’ नाकारला
सत्ता हातात येताच तारिक रहमान यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाही सुधारणांसाठी अंतरिम सरकारने आणलेला ‘जुलै चार्टर’ हा प्रस्ताव त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला. या चार्टरनुसार सर्व खासदारांना घटनात्मक सुधारणा परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घ्यायची होती, मात्र बीएनपीच्या खासदारांनी याला नकार दिला. “आम्ही या कामासाठी निवडून आलेलो नाही,” असे म्हणत बीएनपीने जनमत संग्रहाचा कौल मानण्यास नकार दिला आहे. यामुळे बांगलादेशातील लोकशाही सुधारणांच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे
