वाशिम : शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना पंचशील नगरातील संत गाडगेबाबा शाळेजवळ एका इसमाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेत आढळून आले. डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.

वाशिम : शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना पंचशील नगरातील संत गाडगेबाबा शाळेजवळ एका इसमाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेत आढळून आले. डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.
सदर इसम कोणतीही हालचाल करत नसल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ सुरक्षित करून तपास सुरू केला. आजूबाजूच्या नागरिकांकडून चौकशी केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख राजू तुळशीराम कांबळे (वय ३९, रा. पंचशील नगर) अशी पटली. प्राथमिक अंदाजानुसार ही घटना रात्री १० ते १२ च्या दरम्यान घडली असावी. घटनेच्या उकलसाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. ‘लुसी’ नावाच्या श्वानाने थेट संशयिताच्या घरापर्यंत मार्ग दाखवला. मात्र तेथे आरोपी आढळून न आल्याने पोलिसांनी त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. अल्पवयीन मुलाने सांगितले की, यश तोमर (ठाकूर), वय २०, रा. पंचशील नगर यानेच राजू कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी यश तोमरला तात्काळ ताब्यात घेतले. तपासात असे निष्पन्न झाले की, राजू कांबळे हा गुंडप्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याचे यश ठाकूरसोबत जुने वाद होते. राजूने यशवर यापूर्वी गुन्हे दाखल केले होते आणि पुन्हा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून ‘एकदाचा कायमचा काटा काढण्याच्या’ मानसिकतेतून यशने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलगा साक्षीदार म्हणून समोर आला आहे. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, संजय चौधरी, जितेंद्र आडोळे व त्यांचे पथक व डॉग हॅन्डलर शेषराव शेजुळकर आणि सुभाष इंगोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेमुळे वाशिम शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारीविरोधात पोलिसांची तत्परता व सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
श्वान ‘लुसी’ ठरली तपासाची किल्ली
निर्जन परिसर, रात्रीची वेळ आणि प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही श्वान पथकाच्या अचूक कामगिरीमुळे खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. विशेषतः ‘लुसी’ या श्वानाने संशयितांपर्यंत थेट माग काढत तपासाला निर्णायक दिशा दिली. त्यामुळे या संपूर्ण कारवाईत लुसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.
