वाशिम : जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात वाशिम पोलिसांनी धडक मोहीम सुरू ठेवली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गांजाची वाहतूक करणाऱ्या युवकावर यशस्वी छापा टाकत २ किलो गांजा (किंमत सुमारे ४० हजार रुपये) जप्त केला आहे.

९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकोल्याहून शेलुबाजार येथे गांजा नेला जात असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तातडीने दोन पथके तयार करून सापळा रचला. संदिग्ध हालचाली असलेला एक युवक बॅगसह येताना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचे नाव सोनू उर्फ शेख राजीक शेख मोहम्मद (वय २६, रा. शेलुबाजार, ता. मंगरुळपीर) असे निष्पन्न झाले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता २ किलो गांजा आढळून आला. जागीच पंचनामा करून आरोपीस पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे आणण्यात आले. या प्रकरणी एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर,पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक किशोर शेळके, पोउपनि शेखर मास्कर तसेच एलसीबी व मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या पथकाने परिश्रम घेतले. दरम्यान, जिल्ह्यात कोणीही अवैध गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष, वाशिम येथे कळवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.