सर्वांच्या सहकार्यातून वाशिमचा विकास शक्य : पालकमंत्री दत्तात्रय भरणे |  पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात 

वाशिम : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा सर्वांच्या सहकार्यातूनच शक्य असून, एकत्रित प्रयत्नांमुळे वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा बनेल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

वाशिम : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा सर्वांच्या सहकार्यातूनच शक्य असून, एकत्रित प्रयत्नांमुळे वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा बनेल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले की, वाशिम जिल्ह्याने शेती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शेती, रोजगार, पाणी व्यवस्थापन, रस्ते, घरकुल, महिला सक्षमीकरण, युवक कौशल्य विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ४३१ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून सानुग्रह अनुदान, कृषी यांत्रिकीकरणासाठी महा-डीबीटीद्वारे अनुदान, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी आणि मोदी आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर व पूर्ण झाली आहेत. उमेद अभियानातून हजारो महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थ्यांना नियमित धान्य पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सौर कृषी पंप, सौर प्रकल्प, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, शाळांचे रूपांतरण आणि तिर्थक्षेत्र विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या मूल्यांचे पालन, देशाची एकता आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस, होमगार्ड, एनसीसी, स्काऊट, विविध शाळांचे विद्यार्थी, शिघ्र कृती दल, पोलीस श्वान पथक, अग्निशमन व रुग्णवाहिका पथकांनी परेडमध्ये सहभाग घेतला. वीरपत्नींचा सन्मान तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागासाठी खरेदी केलेल्या २० बोलेरो वाहनांचे अनावरण पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »