Vaijapur taluka have been alerted: गोदापात्रात ४५ हजार क्यूसेकने सोडले पाणी; वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचा इशारा

Vaijapur taluka have been alerted

Vaijapur taluka have been alerted: गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता समोर ठेऊन तालुक्यातील नदीकाठच्या १७ गावांतील नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Vaijapur taluka have been alerted
Vaijapur taluka have been alerted

वैजापूर (छ.संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून ४५ हजार क्युसेकने ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. येत्या २४ तासांत हे पाणी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता समोर ठेऊन तालुक्यातील नदीकाठच्या १७ गावांतील नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील दारणा व पालखेड धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडण्यात आले आहे. त्यानंतर ४५ हजार क्युसेकने हे पाणी तेथून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीत या धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी गोदापात्रात सुरूच होते. परंतु ४ ऑगस्ट रोजी हा विसर्ग ४५ हजार क्युसेकने करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आणखी जोरदार पाऊस झाल्यास येत्या काही दिवसांत पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास तब्बल दोन वर्षानंतर गोदावरीला पूर येण्याची शक्यता आहे. शनिवारी व रविवारी नाशिक जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे ७१४९ दलघफू साठवण क्षमता असलेल्या दारणा धरणात १०० टक्के जलसंचय झाला. दारणा,पालखेड व नांदूर मधमेश्वर पिकअप वेअर पूर्ण क्षमतेने भरल्याने नाशिक पाटबंधारे विभागाने या तिन्हीही प्रकल्पातून गोदेतून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडले आहे. साधारणतः सोमवापर्यंत हे पाणी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक जिल्ह्यातील धरणांचे अतिरिक्त पाणी गोदापात्रात सोडल्याने तालुक्यातील नदीकाठच्या बाबतरा, डोणगाव, नांदूरढोक, लाखगंगा, पुरणगाव, बाभुळगावगंगा, सावखेडगंगा, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, बाजाठाण, चेंडुफळ, भालगाव, चांदेगाव, डागपिंपळगाव, शनिदेवगाव व वांजरगाव या १७ गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे पाणी पैठण येथील जायकवाडी धरणात पोहचणार आहे. सध्या पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे लगेच काठालगतच्या गावांना पुराचा धोका नसला तरी नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास येत्या काही दिवसात गोदावरी रौद्ररुप धारण करु शकते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीच्या सुचना नागरिकांना दिल्या आहेत.

नागरिकांनी नदीपात्राकडे जाऊ नये

नाशिक जिल्ह्यातील धरणातून गोदावरी नदीत ४५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १७ गावांतील नागरिकांना आम्ही सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच मंडळाधिकाऱ्यांसह तलाठी, पोलिस पाटील व कोतवालांनाही सूचना दिल्या असून नागरिकांनी नदीपात्राकडे जाऊ नये.
– सुनील सावंत, तहसीदार, वैजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »