बुलढाणा : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले अंदाजे ३० लाख किमतीचे एकूण १७७ मोबाईल बुलढाणा पोलिसांनी शोधून काढले. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे यांच्याहस्ते मूळ मालकांना त्यांचे मोबाईल २१ जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वितरित करण्यात आले.

विशेष म्हणजे, ही धडाकेबाज कामगिरी बुलढाणा पोलीस व तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने केवळ दोन महिन्यात पूर्ण केली. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून विविध कंपनीचे तब्बल १७७ मोबाईल गहाळ झाल्याचे पोलीस दलाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात आले होते. त्या अनुषंगाने, काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. यासाठी, विशेष शोध मोहीम राबवून गुन्हे शाखा व तांत्रिक विश्लेषण विभागाने ‘पोर्टलद्वारे’ प्रकरणांचा उलगडा करीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावला. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनातील प्रभारी अधिकाऱ्यांनी पार पाडली.
पोलीस कल्याणकारी योजनेच्या पुस्तिकेचे अनावरण
याप्रसंगी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीसाठी एका पुस्तिकेचे अनावरण पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत हजर होते.