Stone pelting in Dhad, 17 people arrested : दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाल्याची गंभीर घटना ३० नोव्हेंबरच्या रात्री उशिरा धाड येथे घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली असून, ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी दिली.
धाड (जि. बुलढाणा) : मिरवणुकी दरम्यान, फटाके फोडण्याचा कारणावरून दोन गटात राडा होवून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाल्याची गंभीर घटना ३० नोव्हेंबरच्या रात्री उशिरा धाड येथे घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली असून, ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी दिली.
धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका मिरवणुकी दरम्यान रात्री फटाके फोडण्यात आले होते. या कारणावरून दोन गटात राडा होवून त्याचे पर्यावसान वादात झाले. वाद इतका टोकाला गेला की, चौकात दगडफेक सुरू झाली होती. तब्बल दोन तास ही दगडफेक सुरू होती. दुसरीकडे रस्त्यावरील वाहनांची नासधूस करीत जाळपोळ केल्या गेली. अडीच तासाहून अधिक वेळ हा राडा चालला. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधिकारी बहुसंख्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटातील वादात हस्तक्षेप करीत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्त्यावर जाळपोळ करण्यात आलेल्या वाहनांना बाजूला लावण्यात आले. रस्ता मोकळा करण्यात आला, त्यांनतर संपूर्ण धाड परिसरात तणाव निर्माण झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमाबंदीचे आदेश लागू केले. सद्यस्थितीत संपूर्ण परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून, पोलीस कर्मचारी धाड येथे ठाण मांडून आहेत. बारीक-सारीक हालचालींवर पोलिसांची नजर आहे. या प्रकरणाची अधिक माहिती बुलढाणा जिल्हा अपर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांनी १ डिसेंबर रोजी सकाळी माध्यमांना दिली. दगडफेक आणि जाळपोळ करण्यात सहभागी असलेल्या ३३ जणांविरोधात पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आले, असे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनी सांगितले.