परभणी : ई-पीक पाहण्यासाठी शेतात जात असतांना बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमध्ये बुडून 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 7 सप्टेंबर रोजी परभणी तालुक्याताील धारणगाव येथे घडली. सोमवार, 8 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मृत युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी तो जिल्हाधिकारी कार्यालयात आणून समसापुर बंधारा फोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली.

गजानन आश्रृबा डुकरे (22 वर्ष), रा. धारणगाव, ता. परभणी असे मृत युवकाचे नाव आहे. गजानन डुकरे हा तरुण रविवारी सकाळी ई-पीक पाहणीसाठी शेतात गेला होता. नदीतून जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी आणि गावातील नागरिकांनी आणि जीवरक्षक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यात त्याचा शोध लागला नव्हता. सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास गजानन डुकरे याचा मृतदेह समसापूर बंधाऱ्यात अडकला असल्याचे दिसून आला. जीवरक्षक पथकाने गजानन डुकरे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
दरम्यान, गजानन डुकरे याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणून प्रशासनास जाब विचारण्याचा प्रयत्न केला. गजानन डुकरे याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत ठिय्या दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी गजानन डुकरे याच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, समसापूर येथील बंधारा हटविण्याची मागणी केली.