Vaijapur Crime : शेतीच्या वादातून कुऱ्हाडी, कोयता व लाठ्याकाठयाने झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना येथे तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे घडली. पेत्रस हरकू सोनवणे (५५, रा.गाढेपिंपळगाव) असे घटनेतील मृताचे नाव आहे.
वैजापूर : शेतीच्या वादातून कुऱ्हाडी, कोयता व लाठ्याकाठयाने झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना येथे तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे घडली. पेत्रस हरकू सोनवणे (५५, रा.गाढेपिंपळगाव) असे घटनेतील मृताचे नाव आहे. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात अरुण आंतावण सोनवणे, आनंद आंतावण सोनवणे, सुशील आनंद सोनवणे, बाळु दगडु सोनवणे, साहेबराव दगडु सोनवणे, अनिल दगडू सोनवणे, शांतावण दगडू सोनवणे, प्रवीण बाळु सोनवणे, विलास बालु सोनवणे, गौरव अजित सोनवणे, राजेश अनिल सोनवणे (सर्व रा. गाढेपिंपळगांव, ता.वैजापूर) खुनासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू हरकू सोनवणे हे तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील रहिवासी असून शेतीव्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. बाबू व पेत्रस सोनवणे हे दोघे भाऊ असून मागील काही दिवसांपासून घटनेतील आरोपी यांच्याशी त्यांचा शेत जमीनीबाबतचा वाद न्यायप्रविष्ट होता. दरम्यान याबाबतचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते व त्यांची मुले शेत नांगरण्यासाठी शेतात गेले होते. नेमके याचवेळी त्याठिकाणी अरुण, आनंद, सुशील, बाळु, साहेबराव, अनिल, शांतावण, प्रवीण, विलास, गौरव, राजेश हे सर्वजण तिथे आले. यासर्वांनी बाबू, त्यांचे भाऊ पेत्रस व इतरांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून कोयता, कुऱ्हाडी व लाठ्या-काठयाने जबर मारहाण केली. या मारहाणीत पेत्रस हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान घटना घडताच पोलिसांनी अरुण, बाळू, विलास व गौरव सोनवणे या चौघांना ताब्यात घेतले. बाबू सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ११ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी या करीत आहेत.