Uddhav Thackeray’s public meeting in Shegaon: गद्दारांच्या हातात ही भुमि आता द्यायची नाही. चोरी, दरोडे, लुटमार होते हे पाहिले आहे. पण पक्षावरती दरोडे पडतात हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले आहे. अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवा. असे आवाहन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
अनुप गवळी/ शेगाव : दिवसाढवळ्या पक्षांवरती दरोडे टाकणाऱ्यांना खऱ्या अर्थाने धडा शिकविण्याबरोबर त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या भुमिवर गद्दारांना थारा नाही. महाराष्ट्र ही संतांची भुमि आहे. आज गजानन महाराजांचे आदर्श घेतले आहे. त्यांना विचारल तुमच्या भुमित गद्दारी कशी चालू शकते. बस झाली ही गद्दारी किती वेळा चालायच असं. गद्दारांच्या हातात ही भुमि आता द्यायची नाही. चोरी, दरोडे, लुटमार होते हे पाहिले आहे. पण पक्षावरती दरोडे पडतात हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले आहे. अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवा. असे आवाहन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
शेगाव येथे 8 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता आयोजित जाहिर सभेत त्यांनी महायुतीवर आगपाखड केली. सर्वप्रथम उध्दव ठाकरे यांनी शेगाव येथे पोहचून श्री संत गजानन महाराज मंदिरात जावून गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शेगाव येथे जळगाव जामोद मतदार संघाचे महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार स्वाती वाकेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा, जळगाव जा. मतदार संघाच्या उमेदवार स्वाती वाकेकर, पक्षनिरिक्षक तथा खासदार कमांडो, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील, माजी आ. कृष्णराव इंगळे, काँग्रेस नेते रामविजय बुरूंगलेंसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र गद्दारांच्या हातात देणार कि निष्ठावंतांच्या हाती तुम्ही ठरवावे
तिन तिघाडा काम बिघाडा करणारे महायुतीचे नेते सगळीकडे फिरत आहे. मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस पाडत आहे. त्याने काही फरक पडणार नाही. राज्यात महाविकास आघाडीची स्थिती चांगली आहे. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची भुमि आहे. ही भुमि आपण तशीच ठेवणार कि मोदी, शहा, अदाणीचा महाराष्ट्र करणार हे तुम्ही ठरवायचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी करा. असे आहवान उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केले.