चिखली : दोन दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात २९ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चिखली शहरातील पुंडलिक नगर भागात घडला.

चिखली : दोन दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात २९ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चिखली शहरातील पुंडलिक नगर भागात घडला. पृथ्वीराज सुरडकर (२०, रा. सोमठाणा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतक पृथ्वीराज सुरडकर हा चिखली शहरातील एका दवाखान्यात कामाला होता. जेवणाचा डब्बा आणण्यासाठी तो जात होता. त्याचवेळी वळण घेताना दुसऱ्या दुचाकीशी त्याची धडक झाली. यामध्ये त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी भाजप नेते दत्ता सुसर यांनी पोहोचून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले होते. आरटीओ पथकाच्या टीमने देखील वेळीच मदतकार्याला हातभार लावला. अपघातात मृत झालेल्या पृथ्वीराजचे वडिल खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मागील आठवड्यात सोमठाणा येथे एका दिव्यांग तरुणाचा खून झाला होता. त्या प्रकरणातील आरोपी म्हणून पृथ्वीराजच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या मृतक पृथ्वीराजचे वडील कारागृहात आहेत.
दुचाकी अपघात वाढले
दरवर्षी दुचाकी आपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. गेल्यावर्षी 129 पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे. हेल्मेट न घातल्याने सर्वाधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हेल्मेट सक्ती बाबत वाहतूक प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असली तरी हेल्मेट वापराबाबत उदासीनता दिसत आहे.