dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एक  लाखांत अडीच लाख? डबल मनीचा बनावट खेळ; फिल्मी स्टाईल पाठलागानंतर टोळीच्या मुसक्या आवळल्या

वाशिम : ‘एक लाख द्या आणि अडीच लाख घ्या’ या लालुचाच्या आमिषाने रचलेला बनावट नोटांचा डाव बासंबा (जि.हिंगोली) पोलिसांनी बुधवारी रात्री उधळून लावला. हिंगोली–वाशिम मार्गावरील कनेरगाव नाका आणि राजगाव  परिसरात सापळा रचत पोलिसांनी कारचा थरारक पाठलाग करून खामगाव (जि. बुलढाणा) येथील दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून तब्बल २.५० लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

वाशिम : ‘एक लाख द्या आणि अडीच लाख घ्या’ या लालुचाच्या आमिषाने रचलेला बनावट नोटांचा डाव बासंबा (जि.हिंगोली) पोलिसांनी बुधवारी रात्री उधळून लावला. हिंगोली–वाशिम मार्गावरील कनेरगाव नाका आणि राजगाव  परिसरात सापळा रचत पोलिसांनी कारचा थरारक पाठलाग करून खामगाव (जि. बुलढाणा) येथील दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून तब्बल २.५० लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लिंगापूर येथील अंतेश्वर भुसारे यांना खामगाव येथील लखन गोपाल बजाज आणि विजय प्रकाशसिंग ठाकूर यांनी संपर्क साधला होता. एक लाख रुपयांच्या बदल्यात अडीच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत त्यांनी ठराविक रक्कम घेऊन कनेरगाव नाका शिवारात येण्यास सांगितले होते.

२४ फेब्रुवारीला सायंकाळी सुमारे सहा वाजता पोलिसांना माहिती मिळाली की, खोट्या नोटांच्या माध्यमातून फसवणूक करणारी टोळी बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आली आहे आणि रात्री ९ ते ९.३० दरम्यान हिंगोली–वाशिम मार्गावरील आंबाळा फाटाजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र संशय आल्याने आरोपींनी फिर्यादीला कनेरगाव नाका येथील पुलाखाली बोलावले. तेथे फिर्यादीकडून १ लाख रुपयांच्या मूळ नोटा घेऊन त्याला ‘भारतीय बच्चौ का बैंक’ असे लिहिलेल्या ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे २.५० लाख रुपयांचे बंडल देण्यात आले. पोलिसांना पाहताच आरोपी कारने तोंडगाव टोलनाक्याकडे पळाले. तेथे आधीच नाकाबंदी करण्यात आली होती. आरोपींनी वाहन वळवून राजगावकडे धाव घेतली. पुढे उकळीपेन बॅरेज येथे ट्रॅक्टर आडवे लावून पोलिसांनी रस्ता रोखला. अखेर चिचंपुरी (जि.हिंगोली) गावाजवळ पोलिसांनी स्वतःचे वाहन आरोपींच्या कारसमोर उभे केले. आरोपी गाडी सोडून पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांच्या नेतृत्वात मदन गव्हाणे, पोले, भडके, हाके, गुंजकर, कराळे, शेख, इंगोले, मस्के तसेच गृहरक्षक दलातील शेख, ठेंगडे, गोरे, पठाण, राऊत यांनी पार पाडली.

खामगावच्या दोघांना अटक; १३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लखन गोपाल बजाज (वय ३६, रा. घाटपुरी नाका, ता. खामगाव, जि. बुलढाणा) व विजय प्रकाशसिंग ठाकूर (वय ४२, रा. शेगाव नाका, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी आहेत. आरोपींकडून चार मोबाईल फोन, “भारतीय बच्चौ का बैंक” असे नमूद असलेली ५०० रुपयांच्या बनावट नोटांची बंडले तसेच एमएच १५ एचसी २२४८ क्रमांकाची चारचाकी कार असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३३६ (३) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top