छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या 47 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा. नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आता कुठलीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या 47 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मा. नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आता कुठलीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
येथे आयोजीत कार्यक्रमात बोलतान नानासाहेब म्हणाले, “मराठा आरक्षण ही केवळ मागणी नसून आमचा हक्क आहे. छावा संघटनेने अण्णासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे व्रत घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत छावा संघटना शांत बसणार नाही.”
या कार्यक्रमात अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या स्मृती जागवत, नानासाहेब यांनी सांगितले की, “अण्णासाहेबांनी आई तुळजाभवानी आरक्षण रथयात्रा काढून मराठा समाजात आरक्षणाबाबत जनजागृती केली. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक नरवडे यांनी केले. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे यांनी अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, “आम्ही अण्णासाहेबांच्या तालमीत तयार झालो असून त्यांचे विचारच आमचे मार्गदर्शक आहेत. शासनाने ‘क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा करून त्यांच्या कार्याला मान्यता दिली आहे.” त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील युवकांना याचा निश्चितच फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला. शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. “शेतकरी हा जगाचा पोशिंदा असूनही तोच आज अडचणीत आहे. हमीभावाच्या अभावामुळे शेतकरी संकटात आहे. अशा स्थितीत छावा संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमात संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव भाऊ मराठे यांनी महाराष्ट्रातील छावा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांचे चिरंजीव, विश्वजीत अण्णासाहेब जावळे यांनी संघटनेची मोर्चेबांधणी अधिक भक्कम करण्यावर भर दिला. मराठा महासंग्राम चे अध्यक्ष अँड राजकुमार सूर्यवंशी यांनी अण्णासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले आणि आभार किरण पाटील यांनी मानले. या जयंती महोत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य छावा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पाटील, दत्ता पाटील, रघुनाथ पवार, बालाजी निकम, , बालाजी एकरगे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.