संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या  चिकित्सा व्हावी : डॉ. लहवितकर : जालना येथे वारकरी साहित्य संमेलनाचा समारोप

जालना :  संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी, महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत, अशी अपेक्षा वारकरी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द्वाराचार्य डॉ रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी रविवार, 14 डिसेंबर रोजी येथे व्यक्त केली.

जालना :  संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी, महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत, अशी अपेक्षा वारकरी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द्वाराचार्य डॉ रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी रविवार, 14 डिसेंबर रोजी येथे व्यक्त केली.

     महाराष्ट्र शासनाचा  मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून जालना एज्युकेशन सोसायटीतर्फे जेईएस महाविद्यालयात आयोजित वारकरी संत साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी अध्यक्षस्थानी जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया हे होते. हभप प्रमोद महाराज जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विचारपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य  प्रा. श्रीधर नांदेडकर, जालना एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीनिवास भक्कड,स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री,कार्यवाह डॉ. यशवंत सोनुने, हभप नाना महाराज पोखरीकर,हभप सोनुने गुरूजी, हभप  अनिरुद्ध महाराज क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

   यावेळी डॉ. लहवितकर म्हणाले, वारकऱ्यांचा धर्म हा व्यापक आहे, संत साहित्य व संत विचार हे मानव कल्याणाचा मार्ग दाखवतात, कीर्तन

 हा मानवतेचा संस्कार आहे तर अभंग हे अनुभवाचे अविष्कार आहेत. अलिकडे समाजाला संत विचार जवळचे वाटू लागले आहेत, त्यामुळेच साहित्य क्षेत्रातही संताचा विचार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. संत साहित्य कळण्यासाठी चिंतनाची  नितांत गरज आहे.संत साहित्य हे सर्वांचे आहे, या साहित्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी धुरंधरांनी  उचलावी. कीर्तनाचे आउटपुट नसले तरी कीर्तनकाराने संहितेप्रमाणे प्रबोधन करायला हवे, वारकरी कीर्तनकाराला अगोदर आपल्या राष्ट्रीयत्वाचे स्पष्ट भान असले पाहिजे, तरच त्याची विश्वात्मक भूमिका सार्थ ठरेल. कुटुंबवत्सलता, ग्रामएकात्मता, समाजशीलता आणि राष्ट्रीय एकात्मभावना कर्तव्यतत्परतेने जपत विश्वात्मक भूमिका अनुसरावी. आज प्रबोधनातूनच नव समाज निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त करत ज्ञानभक्तीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवा, असे आवाहन त्यांनी

केले. संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी,महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत, अशी अपेक्षाही डॉ. लहवितकर यांनी व्यक्त केली. 

            प्रास्ताविक करतांना स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ . गणेश अग्निहोत्री यांनी संतपीठांचे पुनर्रजिवन  व्हावे, जालन्यात लोककला विद्यापीठ स्थापन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करीत वारकरी संत साहित्य संमेलन संमेलनासाठी सहकार्य करणाऱ्या मंडळींचे आभार मानले. 

       यावेळी वारकरी संत साहित्य संमेलनाच्या वतीने नाना महाराज पोखरीकर, सोनुने गुरूजी, डॉ. 

अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांचा

 गौरव करण्यात आला. तसेच वारकरी संत साहित्य संमेलनासाठी सहकार्य केल्याबद्दल जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष पुरूषोत्तम मोतीवाला, सचिव रामनारायण जैस्वाल, सदस्य सुदेश करवा, शाम लखोटिया यांचा विशेष गौरव करण्यात आला. समारोपीय सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब वाघ यांनी केले तर संमेलनाचे कार्यवाह डॉ . यशवंत सोनुने यांनी  आभार मानले.

       यावेळी प्रा. बसवराज कोरे, डॉ. रावसाहेब ढवळे, ॲड. शिवाजी आदमाने, बाबुराव   व्यवहारे, ॲड. सोपानराव भांदरगे, अरुण भोरे यांच्यासह वारकरी संत साहित्य संमेलनाचे पदाधिकारी वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

संमेलनातून संत विचारांचा प्रसार

अध्यक्षीय समारोप करताना पुरूषोत्तम बगडिया यांनी जेईएस महाविद्यालयात समाजाला योग्य दिशा देणारे उपक्रम सातत्याने आयोजित केले जात असल्याचे सांगून वारकरी संत साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे संताचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असे सांगितले. 

संतांच्या विचारात मानवकल्याण 

      यावेळी बोलतांना प्रा. श्रीधर नांदेडकर म्हणाले की, संत परंपरा ही आपल्याला नम्रता शिकवते, वारकरी संत साहित्य संमेलने ही मूल्य संस्कार देतात. संत साहित्याच्या प्रसार होण्यासाठी वारकरी संत साहित्य संमेलन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हभप डॉ. अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांनी संत पंरपरा हीच खरी परंपरा असून संताचे विचार अंगिकारले तरच मानव कल्याण होईल, असे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »