जालना : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, 30 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून अनोखे आंदोलन करण्यात आले.

जालना : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, 30 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून अनोखे आंदोलन करण्यात आले.

निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी करणार नसल्याचे सांगून शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत कर्ज भरण्याबाबत वक्तव्य केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारुन आंदोलनाचा इशारा शनिवारी दिला होता. त्यानुसार रविवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गहू, ज्वारी, मका, कापूस, मोसंबी आदी शेतमालाची गुढी उभारून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीचे अनुदान, पिकविम्याचे अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
सरकारने आठ दिवसाच्या आत जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्यावरची लढाई करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी यावेळी दिला.
यावेळी नरेश फटाले, बाबासाहेब दखणे, अंकुश तारख, मुकेश डूचे, अभिजित काळे, उमेश पाष्टे, राजेंद्र शिनगारे, सतीश मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र निहाळ यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.