गोळेगाव : बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह शनिवार, 13 डिसेंबर रोजी विहिरीत आढळून आला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव (बु) गावात घडली. ज्योती योगेश इंगळे (28 वर्ष), रा. गोळेगाव (बु), ता. सिल्लोड असे मयत महिलेचे नाव आहे.

ज्योती इंगळे ह्या शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून घरातून बेपत्ता होत्या. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेवूनही त्या मिळून आल्या नसल्याने शनिवारी सकाळी त्यांचे नातेवाईक गोळेगाव बुद्रक शिवारातील गट नंबर 283 मध्ये असलेल्या शेतात पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ज्योती इंगळे ह्या विहिरीतील पाण्यात बुडाल्या असल्याचे निदर्शनास आले. ज्योती इंगळे यांच्या नातेवाईकांनी आणि गावातील नागरिकांनी त्यांना विहिरीतून बेशुध्दावस्थेत बाहेर काढून उपचारासाठी अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सागर फोलाने करीत आहेत. मयत ज्योती इंगळे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याचा तपास अजिंठा पोलिस करीत आहेत.