इतिहासाचा अभ्यास करतांना सत्यता पडताळणीसाठी तसेच अनेक घटनांचा उहापोह करण्यासाठी भौतिक साधने अत्यंत महत्वाची असतात. विद्यार्थांना ही साधने उपलब्ध झाली तर इतिहास विषयाची गोडी तर लागतेच शिवाय त्यांना इतिहास अचूक पध्दतीने अभ्यासता येतो. भौतिक साधनाचे हे महत्व अधोरेखित करत शिक्षक राजेश सावळे यांनी मौर्य, यादव, शिवकालीन काळातील ऐतिहासिक विटा विद्यार्थांना उपलब्ध करुन दिल्या आहे.

चिखली : भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे लिहिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. हाच इतिहास वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा वेध घेण्यासाठी दिशादर्शक ठरत असतो. इतिहासाचा अभ्यास करतांना सत्यता पडताळणीसाठी तसेच अनेक घटनांचा उहापोह करण्यासाठी भौतिक साधने अत्यंत महत्वाची असतात. विद्यार्थांना ही साधने उपलब्ध झाली तर इतिहास विषयाची गोडी तर लागतेच शिवाय त्यांना इतिहास अचूक पध्दतीने अभ्यासता येतो. भौतिक साधनाचे हे महत्व अधोरेखित करत शिक्षक राजेश सावळे यांनी मौर्य, यादव, शिवकालीन काळातील ऐतिहासिक विटा विद्यार्थांना उपलब्ध करुन दिल्या आहे.
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा सवणा येथे शिक्षक राजेश सावळे इतिहास विषय शिकवत असताना, मौर्य काळ, ( मौर्य काळातील बौद्ध स्तुपाची वीट) यादव काळ (यादव काळातील पाचवा भिल्लम यांनी बांधलेला अजिंक्य अशा भारतीय वास्तू शास्त्राचा अद्भुत नमुना असणाऱ्या देवगिरी किल्ल्याची वीट) व शिव काळातील (छत्रपती शिवरायांची राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्याची वीट) तत्कालीन विटा प्रत्यक्ष शाळेमध्ये उपलब्ध करून विद्यार्थ्यांना प्रत्याक्षिक देत आहे.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय लोकांना वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, गणित, विज्ञान, भूगोल इत्यादी विषयाचे ज्ञान होते. हे तत्कालीन भौतिक साहित्याचा अभ्यास करून सिद्ध होते. याचेच प्रात्यक्षिक म्हणून प्राचीन व मध्ययुगीन काळातील विटा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिल्या व त्या माध्यमातून त्यांना इतिहासाबद्दल जागृत करत असल्याचे शिक्षक राजेश साळवे यांनी सांगितले. यासाठी त्यांना मार्गदर्शक व संस्थेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक डॉ. मुकीम पटेल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
इतिहास अभ्यासाची भौतिक, लिखित व मौखिक ही तीन साधने आहेत. या साधनांच्या आधारावर इतिहासाची मांडणी केल्या जाते. आजच्या आधुनिक काळामध्ये लोकांना इतिहासाचे महत्त्व नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळे इतिहास हा विषय विद्यार्थी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून ऐतिहासिक संदर्भाच्या संकल्पना पूर्णतः स्पष्ट होण्यासाठी मी मेहनत घेत आहे.
– शिक्षक राजेश साळवे, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा सवणा