सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी शपथ घेतली. राज्याचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख नेते उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री | आमदारांकडून ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी शपथ घेतली. राज्याचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख नेते उपस्थित होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा शपथविधी पार पडला. 

सुनेत्रा पवार यांचा आगमन झाल्यानंतर उपस्थित आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’, ‘एकच वादा अजित दादा’, ‘वहिनी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्राचा एकच दादा, अजित दादा’ अशा घोषणा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. 

शरद पवार, सुप्रिया सुळे अनुपस्थित

शरद पवार यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत याबाबत कोणतीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. या शपथविधीला शरद पवार अनुपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी दुपारी काटेवाडीत आशाताई पवार (अजितदादांच्या मातोश्री) यांची भेट घेतली. ‘मी काकूंना भेटायला आले होते. रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प असल्याने मी इथून दिल्लीला रवाना होणार आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. शपथविधीबाबत मला कल्पना नाही, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. 

सुनेत्रा पवार यांच्यावर तीन खात्यांची जबाबदारी

सुनेत्रा पवार यांना क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खाती मिळाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »