Strong claims by three MLAs from Buldhana: बुधवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात महायुतीला जनतेने कौल दिल्याचे स्पष्ट झाले. तर बुलढाणा जिल्ह्यातील सातपैकी सहा मतदार संघात महायुतीचे वर्चस्व कायम राहिले.
बुलढाणा: बुधवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात महायुतीला जनतेने कौल दिल्याचे स्पष्ट झाले. तर बुलढाणा जिल्ह्यातील सातपैकी सहा मतदार संघात महायुतीचे वर्चस्व कायम राहिले. भाजपाचे चारही उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्यात भाजपाचे पारडे जड ठरले, यामुळे या आमदारांना आता मंत्रीपदाचे वेध लागले आहे. यामधून मंत्रीपदासाठी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले आहे. सातपैकी सहा जागा मिळाल्याने जिल्ह्यातील आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे मनोज कायंदे कायंदे वगळता उर्वरित पाचही आमदार सलग निवडून आले आहेत. त्यामध्ये चैनसुख संचेती हे सहाव्यांदा निवडणूक आले. जळगावचे डॉ. संजय कुटे हे पाचव्यांदा, खामगावचे अॅड. आकाश फुंडकर तिसऱ्यांदा निवडून आल्याने या तिघांची मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदारी मानली जात आहे. त्यांच्यासोबतच चिखलीच्या आमदार श्वेता महाले आणि शिंदेसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनाही त्यांच्या मंत्रीदासाठी आशा लागली आहे.
समर्थकांच्या आशा पल्लवीत..
मलकापुरचे चैनसुख संचेती यांनी सात वेळा निवडणूक लढविली आहे. तर सहा वेळा ते निवडून आले आहेत. त्यांचा अनुभव मोठा असून, मंत्रीपदासाठी त्यांची वर्णी लागू शकते अशी देखील शक्यता आहे. जळगाव जामोदचे डॉ. संजय कुटे हेही पाचव्यांदा आमदार झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात २०१९ मध्ये निवडणुकीपूर्वी शेवटच्या काही महिन्यांत कॅबिनेटमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला होता. तर खामगावचे आकाश फुंडकर हेही सलग तीनदा निवडून आल्याने त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अशा प्रकारे मंत्रीपदासाठी या तिन्ही आमदारांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.
राज्यमंत्री पदासाठी आ.श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा..
विदर्भात महायुतीच्या दोन महिला उमेदवार आमदार झाल्या आहेत. यामध्ये चिखली मतदार संघाच्या श्वेता महाले ह्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहे. तर अमरावती येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके ह्या निवडून आल्या. विदर्भातील या दोन महिला आमदारांपैकी राज्यमंत्री पदासाठी श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांचे पती विद्याधर महाले गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रालयात अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचे वरिष्ठ पातळीवर असलेले संबंध, तसेच श्वेता महाले यांची राजकारणातील सक्रियता पाहता त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा जिल्ह्यात आहे