भोकरदन : विजेची वाढती मागणी आणि यामुळे वीज उत्पादनावर येणारा ताण कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. महावितरण, महासोलारच्या माध्यमातून जागोजागी सौर ऊर्जा प्रकल्पांची संकल्पना राबवली जात आहे. विजेच्या तुटवड्यामुळे भारनियमनाला पर्याय नसतो. मात्र, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन भोकरदन तालुक्यातील वाकडी कुकडी येथे सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. याद्वारे 8 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

भोकरदन तालुक्यातील वाकडी कुकडी येथील गट क्रमांक 226 मधील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर दानापूर उपकेंद्रांतर्गत हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. विजेची वाढती मागणी आणि विजेचा तुटवडा यामुळे महावितरणला ग्रामीण भागात भारनियमन करावे लागते. दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. दिवसा भारनियमन सुरू असल्यामुळे शेतीपिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कृषिपंपासाठी वीज पुरवठा दिला जातो. परिणामी शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करावे लागते. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करता यावा, या उद्देशाने महावितरण, महासोलार ऍग्रो लिमिटेडच्या वतीने 8 मेगावॅट वीज निर्मिती करू शकणारा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. भोकरदन -अन्वा रस्त्यावरील वाकडी कुकडी येथील पाझर तलावाच्या शेजारील जागेत हा विस्तीर्ण प्रकल्प उभारला जात आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी जवळपास 40 टक्के काम पूर्ण झाले असून सोलार प्लेटच्या स्टँड बसवण्यात आल्या आहेत. यानंतर सोलार प्लेट्स, वायरिंग आणि इतर यंत्रणा बसवण्यात येणार आहे. लवकरच ही कामे पूर्ण होऊन साधारणपणे पुढच्या वर्षात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू केला जाईल, अशी अपेक्षा महावितरणच्या वतीने व्यक्त करण्यात आली.