वैजापूर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आठ दिवसांपासून वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील विविध प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असून परिसरातील अनेक गावांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

वैजापूर तालुक्यातील मन्याड साठवण तलाव व कोल्ही मध्यम प्रकल्पात १०९ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर ढेकू मध्यम प्रकल्पात ५८ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोल्ही धरण तुडूंब भरल्यामुळे ओव्हर फ्लोचे पाणी सांडव्यातून वाहू लागले आहे. शिवना टाकळी प्रकल्पातही ८८.३२ टक्के पाणीसाठा असून या प्रकल्पातूनही उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. कोल्ही धरणातून तालुक्यातील शिऊर, खंडाळा, कोल्ही, आलापुरवाडी या गावांना पाणी पुरवठा होतो. गेल्या दोन तीन वर्षापासून पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने कोल्ही मध्यम प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे या भागात शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
यावर्षी मात्र जानेफळ, हिलालपुर व कोरडगांव परिसरात जोरदार पाऊस झाल्याने कोल्ही मध्यम प्रकल्पात पाण्याची मोठी आवक होऊन प्रकल्प १०० टक्के भरले आहे. कोल्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यातून बोर नदीत पाणी वाहू लागले आहे. नदीवरील छोटे मोठे बंधारे पाण्याने भरले असून हे पाणी बोर दहेगांव मध्यम प्रकल्पाकडे वाहत आहे.