वाशिम : जिल्ह्यात दावा न केलेल्या संपत्तीच्या वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे १८ कोटी रुपयांची दावा न केलेली संपत्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा असून, त्यापैकी १५७ खातेदारांना १.२३ कोटी रुपये थेट वितरित करण्यात आले आहेत.

आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या मालमत्तेचे कार्यक्षम व जलद वितरण करण्यासाठी वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय (भारत सरकार) यांच्या पुढाकाराने आयोजित विशेष मोहिमेचा शुभारंभ वाशिम येथील हॉटेल दानीश एम्पायर येथे उत्साहात पार पडला. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश क्षीरसागर, आरसेटी संचालक धनाजी बोईले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागपूरचे प्रबंधक महेश थूल, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेचे प्रबंधक मोहित कुमार यांच्यासह विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे प्रतिनिधी आणि खातेदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून बँकांमध्ये पडून असलेली, परंतु दावा न केलेली रक्कम योग्य खातेदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आरबीआयच्या ध्येय–धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, यासाठी जिल्हा अग्रणी बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या उपक्रमात इतर सर्व बँकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध बँकांच्या स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. यावेळी बँकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.