मानोरा : तालुक्यातील खापरदरी ते सावरगाव कान्होबा हा मंजूर रस्ता वन विभागाच्या परवानगीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी गोरसेना संघटनेच्या पुढाकाराने दोन्ही गावांतील नागरिकांनी ७ नोव्हेंबर रोजी अकोला–आर्णी राष्ट्रीय महामार्गावरील चिखलागड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वन विभागाच्या परवानगीअभावी काम रखडले; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
मानोरा : तालुक्यातील खापरदरी ते सावरगाव कान्होबा हा मंजूर रस्ता वन विभागाच्या परवानगीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी गोरसेना संघटनेच्या पुढाकाराने दोन्ही गावांतील नागरिकांनी ७ नोव्हेंबर रोजी अकोला–आर्णी राष्ट्रीय महामार्गावरील चिखलागड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

खापरदरी ते सावरगाव कान्होबा हा रस्ता मंजूर होऊनही वन विभागाच्या हद्दीतील काही भागासाठी आवश्यक परवानगी मिळाली नसल्याने काम अपूर्ण आहे. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करणे कठीण होते. याबाबत नागरिकांनी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलन करण्यात आले.सकाळी ११.३० वाजता आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या देत घोषणाबाजी केली. त्यामुळे अकोला–आर्णी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील, गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण व तालुकाध्यक्ष सुनील राठोड यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. कामास आणखी विलंब झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात खापरदरीच्या सरपंच बत्तीबाई पवार, माजी सरपंच सारिका पवार, ग्रामपंचायत सदस्य मंगू पवार, किशोर राठोड, संतोष राठोड, विजय चव्हाण, इंदल राठोड, जगदीश राठोड, जाणू राठोड, प्रकाश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.


