वाशिम : अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी वाशिम तालुक्यात मोठी धडक कारवाई केली. ही कारवाई आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच अमरावती विभागाचे विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

६ फेब्रुवारी रोजी वाशिम तालुक्यातील मोहगव्हाण शेतशिवारातील धरणाच्या काठी अवैध हातभट्टीविरोधात सामूहिक मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टी निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर थेट आघात करण्यात आला. या धडक मोहिमेत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून ३० लिटर गावठी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे २ हजार ३७५ लिटर मोहासडवा (रसायन) तसेच हातभट्टीसाठी लागणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९५ हजार १५० रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईत विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्यासह प्रभारी निरीक्षक अनंतकुमार खांदवे, निरीक्षक एम. के. उईके, दुय्यम निरीक्षक राजरतन मनवर, एम. एस. जाधव, अश्विनी उबाळे, सुरेश चव्हाण तसेच अधिनस्त जवान व कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले असून नागरिकांनी अशा प्रकारांबाबत तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.