Prime Minister Narendra Modi’s public meeting in Akola: स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसने शेड्यूलकास्ट समाज, दलीत समाजाला एकजूट होऊ दिले नाही. काँग्रेसने आदिवासी समाजाला देखील वेगवेगळ्या जातीत विभागले. हेच जाती भेदाचे राजकारण काँग्रेसने ओबीसी समाजा सोबतही केल्याचा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
अकोला : विधानसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. आज (शनिवार ९ नोव्हेंबर रोजी) त्यांनी अकोल्यात आपल्या जाहिर सभेतून काँग्रेसवर घाणाघात करत जाती भेद हीच काँग्रेसची नियत असल्याचा आरोप केला. स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसने शेड्यूलकास्ट समाज, दलीत समाजाला एकजूट होऊ दिले नाही. काँग्रेसने आदिवासी समाजाला देखील वेगवेगळ्या जातीत विभागले. हेच जाती भेदाचे राजकारण काँग्रेसने ओबीसी समाजा सोबतही केल्याचा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोल्यातील डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर शनिवार ९ नोव्हेंबर रोजी आयोजित जाहीर समेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. सभास्थळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळ, खासदार अनुप धोत्रे व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी पश्चिम विदर्भातल्या वऱ्हाड भागातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील १५ मतदारसंघांसाठी उमेदवार उपस्थित होते. यासोबतच अकोला, बुलढाणा आणि वाशिममधील महायुतीचे सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते. काँग्रेसच्या जीती भेदावर हल्ला बोल करत असताना मोदी म्हणाले की, काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचे काम करत आहे. तुम्ही जातीत जातीत भांडण करत असाल, तर त्याचा फायदा काँग्रेस घेईल. हेच काँग्रेसचे चरित्र असल्याचा आरोप यावेळी मोदी यांनी केला.
मोदींनी काढले श्रीराम अस्त्र, ९ तारखेचे सांगितले महत्त्व
सभेत त्यांनी राम मंदिराच्या निकालाच्या मुद्द्यावर पुन्हा वक्तव्य केले आहे. तसेच ९ नोव्हेंबर या तारखेची आठवण करून दिली आहे. राम मंदिराच्या निकालाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत नरेंद्र मोदी म्हणाले की, ९ नोव्हेंबर ही तारीख खूप ऐतिहासिक आहे. २०१९ मध्ये याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्रत्येक धर्माच्या लोकानी प्रचंड संवेदनशीलता दाखवली. राष्ट्र प्रथम ही भावना भारताची मोठी ताकद असल्याचे म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणूकीत श्रीराम अस्त्र काढले.
‘महाराष्ट्राला काँग्रेसचे शाही ‘एटीएम’ होऊ देणार नाही’
जिथे काँग्रेसची सरकार, ते राज्य काँग्रेस परिवाराचे शाही एटीएम बनते, असा घाणाघाती आरोप करत, महाराष्ट्राला काँग्रेस परिवाराचे शाही एटीएम होऊ देणार नसल्याचे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले.
‘महाआघाडीने विकासाची गती थांबवली’
महाराष्ट्र आणि विदर्भातील पाण्याची समस्या दूर करून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून आमच्या सरकाने सिंचन प्रकल्पांना सुरुवात केली होती. मात्र, मध्यंतरी महाआघाडी सरकारने त्या योजना थांबवत महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबवली होती, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.
काँग्रेसचे ३७० ला समर्थन
जम्मू कश्मिर विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगींनी कलम ३७० चा प्रस्ताव मंजूर केला आहे. अल्गाववादी, आतंकवाद्यांनी तसेच पाकिस्तान आणि भारत विरोधी शक्तींनी ३७० चे समर्थन केले होते. तेच काँग्रेस करत असून कश्मिरला पुन्हा हिंसक वळणावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. ७५ वर्षांपासून देशात जम्मू कश्मिरमध्ये २ संविधान होते. आम्ही ३७० ची भिंत तोडली आणि जम्मू कश्मिरमध्ये बाबासाहेबांचे संविधान आणले. मात्र, ३७० ला समर्थम करत काँग्रेस बाबासाहेबांचे संविधान जम्मू कश्मिरमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
पंत्रपधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं सौभाग्य आम्हाला मिळाले. हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे.
गरीबांसाठी ३ कोटी नवीन घर बनविण्यास सुरुवात. महाराष्ट्रातील लाखो गरीबांचे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण होईल.
७० वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना वयवंदना कार्ड अंतर्गत मोफत उपचार.
महिलांची सुरक्षा आणि माझी लाडकी बहीण योजनेचा विस्तार.