भोकरदन : अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अडवून, शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील गोकुळ नदी परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस प्रशांत शेषराव उबाळे (४२) हे 4.15 वाजेच्या सुमारास गोकुळ ते भोकरदन जाणाऱ्या रोडवर कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना गोकुळ नदीच्या पात्रातून एक विना क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून चोरीची वाहतूक करताना आढळला. उबाळे यांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे चौकशी केली, तेव्हा चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. पोलीस कर्मचारी उबाळे हे या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करत असताना, त्याठिकाणी आरोपींनी त्यांचे साथीदार बोलावून घेतले. यावेळी आरोपी आप्पासाहेब दामोधर शेरकर, वैभव आप्पासाहेब शेरकर आणि आकाश उत्तम शेरकर सर्व रा.गोकुळ, ता. भोकरदन यांनी उबाळे यांना घेराव घातला. त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत उबाळे यांना धक्काबुक्की केली व जप्त केलेला वाळूचा ट्रॅक्टर जबरदस्तीने तेथून पळवून नेला. यावेळी मुख्य आरोपी आप्पासाहेब शेरकर याने, तू भोकरदन येथे कशी नोकरी करतो, ते तुला दाखवतो, अशी उघड धमकी उबाळे यांना दिली. याप्रकरणी पोलीस प्रशांत उबाळे यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात आप्पासाहेब दामोधर शेरकर, वैभव आप्पासाहेब शेरकर, आकाश उत्तम शेरकर, ट्रॅक्टर चालक (नाव माहीत नाही) यांच्यासह पाच ते सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल मंडलिक हे करत आहेत.