Pentakali Water Utilization Association Federation awarded : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या जल पुरस्काराचा यंदाचा मानकरी मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघ ठरला आहे. महासंघाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
मेहकर : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या जल पुरस्काराचा यंदाचा मानकरी मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघ ठरला आहे. महासंघाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची उपस्थिती होती.
सिंचन प्रकल्पातील पाण्याचा काटकसरीने वापर, त्याचे योग्य नियोजन आणि कमी पाण्यात अधिकाधिक सिंचन करणे या कार्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने देशभरातील तीन संस्थांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचा प्रथम क्रमांकाचा जल पुरस्कार मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या पाणी वापर संस्था महासंघाला मिळाला आहे. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटक, तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार तामिळनाडू राज्यातील संस्थेला मिळाला आहे. पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघ केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. २२ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आयोजित समारंभात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते संबंधित खात्याचे मंत्री सी.आर. पाटील यांच्या उपस्थितीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पेनटाकळी संस्था महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी स्वीकारला. महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर व सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता रमेश गट्टानी यांच्या नेतृत्वात सिंचनासाठी पाण्याच्या योग्य नियोजनाच्या कार्याची दखल घेत जलमंत्रालयाने या पुरस्कारासाठी संस्थेची निवड केलेली आहे.
९ हजार ८८४ हेक्टर शेती सिंचनाखाली
पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघाअंतर्गत बारा पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून ९ हजार ८८४ हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. २००५ सालापासून पाण्याच्या योग्य नियोजनासाठी या पाणी वापर संस्था काम करतात.
यापूर्वी हे मिळाले पुरस्कार
पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघाला यापूर्वी २०१५ सालचा विमलताई बेलसरे जल पुरस्कार, २०१८ सालचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.