pdkv laborers block the road : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील रोजंदारी मजूरांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी वणीरंभापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला, मात्र माघार न घेता आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याचे चित्र दिसून आले.
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील रोजंदारी मजूरांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी वणीरंभापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला, मात्र माघार न घेता आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याचे चित्र दिसून आले.
विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर मजुरांना बारमाही काम देण्यात यावे, शासनाने बंद केलेली कंत्राटी पध्दत बंद करण्यात यावी. किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार मजुरांच्या सन-२०१४ च्या शासकीय नियमानुसार वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, आदी मागण्यासाठी शुक्रवारी कृषी विद्यापीठातील रोजंदारी मजूरांनी वणीरंभापूर येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन पुकारले. आंदोलनात शेकडो रोजंदारी मजूरांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तास दोन तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. यावेली पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज करत आंदोलन मोडून काढत आंदोलकांना ताब्यात घेतले. राज्य शासनाने दडपशाही करून आंदोलन मोडून काढला, असा आरोप आंदोलकांनी याप्रसंगी केला.
कृषी मंत्री यांचे आश्वासन फोल ठरले
यापूर्वी कृषी विद्यापीठातील रोजंदारी मजूरांनी आपल्य प्रलंबीत मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तोडगा निघाला नाही. कृषी मंत्री मुंडे यांचे आश्वासन फोल ठरल्याने शेतमजुरांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारले.
आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम
जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार, अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.