ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ यशस्वी; पाच मुलांची सुटका: आरपीएफची कारवाई; मुले वाशिम चाईल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द

वाशिम :  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने  वाशिम रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या कारवायांमधून आरपीएफ च्या दक्षतेचा प्रत्यय आला आहे. ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत वाशिम रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची आरपीएफने सुटका केली. 

वाशिम :  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने  वाशिम रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या कारवायांमधून आरपीएफ च्या दक्षतेचा प्रत्यय आला आहे. ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत वाशिम रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची आरपीएफने सुटका केली. रेल्वे सुरक्षा बलाचे हेड कॉन्स्टेबल एस. एम. बालखंडे यांना ही मुले घाबरलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन (1098) ला माहिती देत पुढील कार्यवाही केली. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन व पडताळणी केल्यानंतर सोमवारी मुलांना सुरक्षितपणे चाईल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत आरपीएफ कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकतेचे उदाहरण घालून दिले. नांदेड रेल्वे स्थानकावर हेड कॉन्स्टेबल एस. श्रीधर यांनी ट्रेन क्रमांक 11001 एक्सप्रेसमध्ये प्रवाशाने विसरलेले सुमारे ८ हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे मनगटी घड्याळ शोधून ते मालकाला परत केले. तसेच जालना स्थानकावर कॉन्स्टेबल संदीप जाधव यांनी बेवारस बॅग शोधून त्यातील मोबाईल व औषधे संबंधित प्रवाशाला परत दिली. याशिवाय, ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत RPF व लोहमार्ग पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पूर्णा जंक्शन येथे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. तो चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला. पुढील तपासात त्याचा संबंध सुमारे २ लाख रुपये किमतीच्या चोरी प्रकरणाशी असल्याचे उघड झाले. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »