Onion producers in Vaijapur are aggressive:ऑक्टोबर महिन्यापासुन वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी सागर सुनील राजपूत हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्यापोटीचे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन पसार झाला आहे.
वैजापूर : ऑक्टोबर महिन्यापासुन वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी सागर सुनील राजपूत हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्यापोटीचे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन पसार झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर बाजार समितीने सागर राजपूत विरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा नोंदवला. मात्र कांदा उत्पादकांना मागील दोन ते तीन महिन्यांपासुन बाजार समितीकडुन पैशाची कुठलीही हमी अगर रक्कम मिळत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी, 25 नोव्हेंबर रोजी वैजापुरातील बाजार समितीचे कार्यालय गाठले व सभापती रामहरी बापू जाधव, सचिव प्रल्हाद मोटे व संचालकांना घेराव घातला. पैशाची सोय करा, नाही तर राजीनामे द्या, मार्केट बंद ठेवा असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सभापतीसह संचालक मंडळ हतबल झाले होते.
अखेर शेतकऱ्यांच्या मागणीवरुन कांदा विक्रीच्या रकमेची व्यवस्था होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीवरुन २६ नोव्हेंबरपासुन वैजापूर येथील कांदा मार्केट व मका मार्केट, भुसार मार्केट तसेच शिऊर येथील उपबाजार बंद ठेवण्याचे लेखी पत्र सभापती रामहरी जाधव व सचिव प्रल्हाद मोटे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांचा जमाव शांत झाला. दरम्यान, बाजार समितीचे कार्यालय व आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने उपविभागिय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक शांतीलाल कौठाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता. यावेळी बाजार समितीचे संचालक कल्याण दांगोडे, उल्हास पवार आदींची उपस्थिती होती. बाजार समितीच्या घायगाव शिवारातील कांदा मार्केटमध्ये साई बालाजी ट्रेडिंगचा मालक सागर राजपूत याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडुन कांदा खरेदी केला होता. बाजार समितीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, शेतकऱ्यांनी राजपूत यास सुमारे दोन कोटी १३ लाख ३३ हजार ६१३ रुपये किमतीचा कांदा विकला होता. त्यापैकी शेतकऱ्यांना केवळ १६ लाख रुपयांची उचल देण्यात आली. उर्वरित एक कोटी ९७ लाख ३२ हजार १५२ रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतकऱ्यांची संख्या चारशेहुन अधिक असुन या शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे न मिळाल्याने त्यांनी दिवाळी साजरी केली नाही.