Murder of old man: शहरातील सातारा भागात एका ६२ वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज 16 एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा भागात एका ६२ वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज 16 एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. श्रीकृष्ण वामन पाटील असे हत्या झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात सिल्व्हर रेसिडेन्सीमध्ये पत्नी, मुलगा व लहान मुलीसह वास्तव्यास होते. सोमवारी कुटुंबासोबत जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मात्र पाटील धक्कादायकरित्या घरात मृतावस्थेत आढळले. सातारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, गुन्हे शाखेचे संदीप गुरमे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडूळे, साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अमोल कामठे, नंदकुमार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या पोट व पाठीवर टोकदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले. पाटील यांचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाकडे पाठविण्यात आला.
घटनेचा तपास सुरू
घरात पत्नी, मुलगा, मुलगी घरात असताना पाटील यांची हत्या झाली कशी? कोणालाच त्यांच्या ओरडण्याचा आवाज कसा आला नाही? असे गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.