MLA Sanjay Gaikwad entered the arena of Lok Sabha: लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्याचे राजकारण तापत असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 28 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.
बुलढाणा : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्याचे राजकारण तापत असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 28 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, येत्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळणार की काय? यावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून शिंदेंच्या शिवसेनेचे निरीक्षक बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी आ. संजय गायकवाडांच्या समर्थकांनी त्यांच्याकडे विद्यमान खासदारांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तर, काही महिन्यापूर्वी स्वतः आ.संजय गायकवाड यांनी खा.जाधव भाजपच्या सर्वेत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते.
त्याआधी आ.गायकवाड यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत देणारे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. दरम्यान, आ. गायकवाड यांनी गुरूवार, 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या दालनात पोहचून त्यांच्याकडे आपला नामांकन अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी त्यांच्यासोबत बुलढाणा शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड आदी उपस्थित होते.
अर्ज मागे घेण्यासाठी भरला जात नाही
यावेळी आ संजय गायकवाड यांनी एक नव्हे, तर दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. एक उमेदवारी अर्ज पक्षाकडून, तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अर्ज मागे घेण्यासाठी भरला जात नाही, त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या उमेदवारीच्या निश्चीतीचीही चर्चा सुरू झाली आहे.