जळगाव जामोद : एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे.

जळगाव जामोद : एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात १ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणलेला खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. २ मार्च २०२६ रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास कवठळ गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा इंट्रा’ गाडीने वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात वृषाली यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि सत्य समोर आले.पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास चक्रावून टाकला. तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (MH 28 BB 5753) गाडीकडे वळाली. ही गाडी मनीष नारायणसिंग सुर्यवंशी (रा. जगदंबा नगर, शेगाव) याची असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेण्यात आले. जळगाव जामोद पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत मनीषने या थरारक कटाची कबुली दिली आहे.मनीषने दिलेल्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुख्य सूत्रधार: मृत वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार (रा. पातुर्डा) यांनी मिळून हा कट रचला होता.
विषाचा प्रयोगही फसला होता
यापूर्वी वृषाली यांना अन्नातून विष देऊन मारण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. अखेर आरोपींनी मनीष सुर्यवंशी याला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी १,००,००० रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे २ मार्चच्या सकाळी मनीषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारून त्यांना खाली पाडले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.या गुन्ह्यात १. वाहन चालक मनीष नारायणसिंग सुर्यवंशी, २.मध्यस्थ मंगेश चुलकार आणि ३. पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांनाही पोलिसांनी निष्पन्न केले आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ६१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
