नवी दिल्ली : भारत आणि रशियामधील १०० अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट २०३० पूर्वी साध्य होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या आठ दशकांमध्ये जगाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मानवतेने अनेक आव्हाने आणि संकटांना तोंड दिले आहे. परंतु या सर्व काळात भारत-रशिया मैत्री नेहमीच ध्रुव ताऱ्यासारखी अढळ आणि स्थिर राहिली आहे. दरम्यान, रशिया कोणत्याही व्यत्ययाशिवाय भारताला तेल पुरवठा करत राहील, असे रशियाचे अध्यक्ष म्हणाले.

नवी दिल्ली : भारत आणि रशियामधील १०० अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट २०३० पूर्वी साध्य होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या आठ दशकांमध्ये जगाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मानवतेने अनेक आव्हाने आणि संकटांना तोंड दिले आहे. परंतु या सर्व काळात भारत-रशिया मैत्री नेहमीच ध्रुव ताऱ्यासारखी अढळ आणि स्थिर राहिली आहे. दरम्यान, रशिया कोणत्याही व्यत्ययाशिवाय भारताला तेल पुरवठा करत राहील, असे रशियाचे अध्यक्ष म्हणाले.
भारताच्या दौऱ्यावर असलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे 5 डिसेंबर रोजी सकाळी राष्ट्रपती भवनात २१ तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर पुतिन राजघाटावर गेले आणि त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. दरम्यान, पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना पुढील वर्षी मॉस्को येथे होणाऱ्या भारत-रशिया शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. यावेळी मोदी म्हणाले पर्यटन भारत-रशिया भागीदारीला नवीन उंचीवर नेईल. आज दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी पर्यटन व्हिसाच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, टूर ऑपरेटर्ससाठी नवीन व्यवसाय संधी उपलब्ध होतील आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आज भारत आणि रशिया नवोपक्रम, सह-उत्पादन आणि सह-निर्मितीच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. आपले ध्येय केवळ द्विपक्षीय व्यापार वाढवणे नाही तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण सुनिश्चित करणे आहे. यासाठी जागतिक आव्हानांवर शाश्वत उपाय विकसित करणे आवश्यक आहे. मोदी म्हणाले की, त्यांनी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुतिन यांनी भारताला इंधन आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा अखंड सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
रशियन नागरिकांना भारतात येण्यासाठी फ्री व्हिसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात शुक्रवारी दिल्लीत झालेल्या 23 व्या शिखर परिषदेनंतर अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. मोदी यांनी रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचा मोफत ई-टुरिस्ट व्हिसा जाहीर केला. दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्ध भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला.
भारत आणि रशिया यांच्यात महत्त्वाचे करार
ऊर्जा सहकार्य : रशियाने भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला सातत्यपूर्ण आणि अखंड इंधन पुरवठा करत राहण्याचे आश्वासन दिले.
औद्योगिक भागीदारी: भारतीय कंपन्यांनी रशियामध्ये युरिया प्लांट स्थापन करण्यासाठी रशिया सोबत करार केला.
अन्न सुरक्षा: अन्न सुरक्षा नियम मजबूत करण्यासाठी भारत आणि रशियाच्या ग्राहक संरक्षण संस्थेमध्ये औपचारिक करार करण्यात आले.
आरोग्यसेवा सहकार्य : वैद्यकीय संशोधन आणि आरोग्यसेवेमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी अनेक सामंजस्य करार करण्यात आले.
सागरी रसद : बंदर आणि शिपिंग ऑपरेशन्समध्ये भारत-रशिया सहकार्य वाढविण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला.
स्थलांतर आणि गतिशीलता : दोन्ही देशांनी लोकांची हालचाल सुलभ करण्यासाठी आणि स्थलांतर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली.
