अवैध पाणी उपशाविरोधात बेमुदत उपोषण : कळंबा महाली – फाळेगाव प्रकल्पाचे पाणी राखीव ठेवण्याची मागणी

वाशिम : तालुक्यातील कळंबा महाली लघु पाटबंधारे प्रकल्प तसेच फाळेगाव थेट तलावावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याच्या निषेधार्थ १० मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

वाशिम : तालुक्यातील कळंबा महाली लघु पाटबंधारे प्रकल्प तसेच फाळेगाव थेट तलावावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याच्या निषेधार्थ १० मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सय्यद सलीम सय्यद मुनाफ, सार्थीक वानखडे आणि आदित्य खंदारे यांनी हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फाळेगाव थेट तलावावरून मोठ्या क्षमतेच्या मोटार पंपांच्या सहाय्याने पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली असून पाण्याचे तापमान वाढल्यामुळे मत्स्यबीज व मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत. परिणामी जलचर, उभयचर प्राणी, पशु-पक्षी तसेच गुरे-ढोरे यांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमांनुसार रब्बी हंगामासाठी पाणी उपसा करण्याची परवानगी केवळ २८ फेब्रुवारीपर्यंतच वैध होती. तसेच उपसा सिंचनासाठी केवळ १२ हेक्टर क्षेत्रासाठी परवाना देण्यात आलेला असताना काही शेतकरी १० ते १५ एचपी क्षमतेच्या मोटारपंपांचा वापर करून मोठ्या क्षेत्रावर अवैधरीत्या पाणी उपसा करत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. तलावातील पाणी मानवांसह प्राणी, पक्षी आणि जनावरांसाठी राखीव ठेवावे, अवैध मोटारपंप तातडीने हटवावेत आणि जैवविविधतेचे संरक्षण करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.  

परवान्याविना पाणी उपसा

लघु पाटबंधारे विभागाने २४ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या पाहणीतही काही ठिकाणी उपसा सिंचन परवान्याविना तसेच धरण भिंतीवरून पाणी उपसा होत असल्याचे आढळून आले होते. याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देऊन अवैध पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच सिंचन अधिनियम १९७६ व सुधारित २००५ नुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »