मंगरूळपीर : तालुक्यातील कोठारी येथे सोमवारी (८ सप्टेंबर) दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पतीने प्रथम पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं. या दुहेरी मृत्यूने कोठारी गाव हादरलं असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मंगरूळपीर : तालुक्यातील कोठारी येथे सोमवारी (८ सप्टेंबर) दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पतीने प्रथम पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं. या दुहेरी मृत्यूने कोठारी गाव हादरलं असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतक हिमंत महादेव धोंगडे (वय ४१) हे पत्नी कल्पना हिमंत धोंगडे (वय ३४) आणि तीन मुलांसह स्वतंत्र घरात राहत होते. हिमंत यांना दारूचे व्यसन होते तसेच ते गेल्या तीन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांचा वाशिम येथे एका डॉक्टरकडे उपचार सुरू होता. मागील काही दिवसांपासून त्यांचा मानसिक अस्वस्थपणा अधिक वाढला होता. ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचे ठरवले. यासाठी गावात आटो बोलावण्यात आली होती. मात्र, हिमंत यांना दवाखान्यात नेणार असल्याचे कळताच त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी घरात त्यांची पत्नी कल्पना देखील होती. शेजाऱ्यांनी आणि भावाने वारंवार आवाज दिला, परंतु दरवाजा उघडला गेला नाही. काही वेळानंतर घरातून कल्पना यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या. शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता कल्पना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, तर हिमंत यांनी स्वतःला घरातील लोखंडी नाटीला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने गळफास लावलेला दिसला. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि गावकऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. घरात पाहणी केल्यावर कल्पना यांच्या डोक्यावर लोखंडी विळ्याने प्रहार करून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिमंत यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
