छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात सापडला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मंगळवार, 8 एप्रिल सकाळपासूनच शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात सापडला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मंगळवार, 8 एप्रिल सकाळपासूनच शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी व खासगी दहा ते बारा पाण्याचे बंब आगीवर पाण्याचा मारा करीत असून सायंकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. या आगीमुळे ऐतिहासीक देवगिरी किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना नसता मनस्ताप सहन करावा लागला.
ऐतिहासीक देवगिरी किल्ल्याभोवती असलेल्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत असून मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास या गवताला आग लागली. वाळलेले गवत आणि उन्हाच्या झळ्यामुळे पाहता – पाहता आगीने रौद्ररुप धारण करीत किल्ल्याला चारही बाजूने वेढा दिला. त्यामुळे दुरुवरुनच किल्ल्यावरुन उठणारे आगीचे लोळ दिसत होते. किल्ल्याला चारही बाजूने आग लागल्याने आजू-बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
दरम्यान, पुरातत्व विभागाने या किल्ल्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यावर पद्मपूरा, वाळूज, सिडको अग्निशमन दलाच्या बंबासह खासगी कंपन्यांच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा सुरु केला. किल्याला चारही बाजूने आग लागली असल्याने तसेच किल्ल्यापर्यंत जाण्यास रस्ता नसल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना दुरवरुनच आगीवर पाण्याचा मारा करावा लागत होता. दौलताबाद किल्ल्याला लागलेली आग सायंकाळी उशिरापर्यंत आटोक्यात आली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.