अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप परिसरातील रोहाटिया स्पिनर सूतगिरणीला शनिवारी दुपारी सुमारे १.३० वाजता भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली. घटना घडून दोन ते तीन तास उलटूनही आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविता आले नव्हते.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अकोला एमआयडीसीच्या दोन ते तीन आणि अकोला महानगरपालिकेच्या दोन अशा एकूण चार ते पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीची तीव्रता लक्षात घेता अतिरिक्त अग्निशमन गाड्या बोलाविण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. या आगीत सूतगिरणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे. मात्र, नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच जीवितहानी झाली किंवा नाही, याबाबतही स्पष्टता नाही. आग पूर्णपणे विझल्यानंतरच नुकसानीचा तपशील आणि आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांकडून परिसरात खबरदारी
घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची गर्दी होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली.