जालना : नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर सोमवार,15 डिसेंबर रोजी राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजला. दरम्यान, राज्यातील 29 वी महानगरपालिका ठरलेल्या जालना शहर महानगरपालिकेची पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्यामुळे महापालिकेवर वर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तथापि, प्रमुख राजकीय पक्षातील युती – आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे आता या घडामोडीला वेग येणार आहे.

जालना : नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर सोमवार,15 डिसेंबर रोजी राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजला. दरम्यान, राज्यातील 29 वी महानगरपालिका ठरलेल्या जालना शहर महानगरपालिकेची पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्यामुळे महापालिकेवर वर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तथापि, प्रमुख राजकीय पक्षातील युती – आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे आता या घडामोडीला वेग येणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी नव्या वर्षांत 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तथापि, निवडणूक तयारी, युती – आघाडी, उमेदवार निश्चिती आणि प्रचारासाठी 30 दिवसांचाच कालावधी मिळाला आहे. याशिवाय येत्या 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्यामुळे तेथून पुढे सातच दिवसात उमेदवारांना तिकीट वाटप आणि उमेदवारी दाखल करावे लागणार आहे. दरम्यान, सोमवारपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जालना महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 65 जागा असून त्यापैकी 34 जागा महिलांसाठी राखीव आहेत. शहरात 16 प्रभाग रचना करण्यात आली असून याच प्रभागांतून 65 नगरसेवक निवडून येणार आहेत. साधारणपणे एका प्रभागात 4 नगरसेवक निवडणून द्यावे लागणार असून पहिल्या प्रभागात 5 नगरसेवक असतील. महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे तिकीट वाटपासाठी राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे.
भाजपचे स्वबळ; मित्रपक्षांची युती?
राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची स्थानिक निवडणुकीत मात्र स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दिसून येत आहे. विशेष करून भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट संकेत दिले आहे. तर सत्तेतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता आहे.
खोतकर – गोरंट्याल संघर्षाचे द्वंद
एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि आता भाजपमध्ये गेलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात तीव्र राजकीय शत्रुत्व असून जालना नगरपालिकेवर गोरंट्याल यांचे वर्चस्व होते. आता पहिल्याच महापालिकेवर देखील आपलीच सत्ता असावी, अशा उद्देशाने गोरंट्याल भाजपच्या गोटात सामील झालेले आहे. तर आमदार अर्जुन खोतकर यांनाही महापालिका आपल्या ताब्यात घ्यायची इच्छा आहे. त्यामुळे ते पूर्ण ताकदीने जोर लावतील. त्यामुळे या दोघांतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा निवडणुकीत दिसून येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी : 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत : 2 जानेवारी
निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी
मतदान : 15 जानेवारी
मतमोजणी : 16 जानेवारी
