Employees, show up by Thursday, or suspension: लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनही एक्शन मोडवर आले असल्याचे चित्र आहे. कारण, 4 ते 7 एप्रिलदरम्यान मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर: एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनही एक्शन मोडवर आले असल्याचे चित्र आहे. कारण, 4 ते 7 एप्रिलदरम्यान मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.
प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या दांडी बहाद्दर कर्मचार्यांनी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत एआरओकडे रिपोर्ट सादर करावा, अन्यथा गैरहजर कर्मचार्यांवर निलंबनाच्या कारवाईसह विविध कायद्यानुसार कारवाई करू असा कडक इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला. विशेष म्हणजे जे कर्मचारी गुरुवारी हाजेरी लावतील अशा कर्मचार्यांना शॉर्ट ट्रेनिंग दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
एवढ्या कर्मचाऱ्यांनी मारली दांडी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदान प्रक्रियेतील कर्मचार्यांना मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणीबाबत चार दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात नऊ मतदार संघाचा समावेश आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी 570 कर्मचार्यांनी दांडी मारली होती. तसेच शनिवारी सिल्लोड, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या चार विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या प्रशिक्षणात 302 जणांनी दांडी मारली. तर पश्चिम मतदार संघातील प्रशिक्षणाच्या दोन्ही सत्रात 326 कर्मचार्यांनी दांडी मारली होती.
…अन्यथा निलंबन
या दांडीबहाद्दरांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून अशा कर्मचार्यांनी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या एआरओकडे रिपोर्ट करावा. तसे न केल्यास त्यांच्यावर निलंबनाच्या करावाईसह महाराष्ट्र नागरी सेवा निवडणूक नियमावली, लोकप्रतिनिधित्व कायदा यासह जेवढे कायदे लावता येतील तेवढ्या कायद्यांनूसार कारवाई करु असा कडक इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला आहे. तसेच मतदान प्रक्रियेत सहभी न होण्यासाठी अनेक कर्मचारी दबावतंत्रासह वैद्यकिय प्रमाणपत्राचा आधार घेतला असून त्यातील काही वैद्यकिय प्रमाणपत्र हे बनावट असल्याची शक्यता देखील जिल्हाधिकार्यांनी वर्तविली आहे.
डॉक्टरांवरही कारवाई करू
इलेक्शन ड्युटी नको म्हणून काही कर्मचारी हे डॉक्टरांच्या बोगस वैद्यकिय प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे बोगस प्रमाणपत्र ज्या डॉक्टरांनी ते सर्टीफाय केले त्या डॉक्टरांना पाचारण करुन त्या प्रमाणपत्राची सत्यता पडताळली जाणार आहे. त्यात तिळमात्र शंका आल्यास, वैद्यकिय महाविद्यालय येथील डॉक्टरांच्या पथकाकडून त्या कर्मचार्यांची सॅम्पल तपासणी केली जाणार आहे. त्यात जर कर्मचार्याला काहीच आजार निघाला नाही तर ज्या डॉक्टरांनी वैद्यकिय प्रमाणपत्र दिले त्या डॉक्टरांवर निवडणूक आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी 420 कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचाही इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला.