जालना : जरांगे यांनी हट्ट धरलेला आहे. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. ओबीसींचे अस्तित्व संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलेली आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून. त्यामुळे त्यांचा बालहट्ट कायम राहील. सरकारमध्ये राहून फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे आतून काम करीत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी येथे केला.

जालना : जरांगे यांनी हट्ट धरलेला आहे. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. ओबीसींचे अस्तित्व संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलेली आहे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून. त्यामुळे त्यांचा बालहट्ट कायम राहील. सरकारमध्ये राहून फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे आतून काम करीत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी येथे केला.
क्रांतीदिनी मुंबईत मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी जालना येथे एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मनोज जरांगे यांना ओबीसींचे आरक्षण पाहिजे. मात्र, त्यांना काहीही कळत नाही. ते अक्कलशून्य आहेत. त्यामुळे ते मागतात ते आरक्षण देता येत नाही. सरकारने ते देऊ नये, अशी आमची मागणी आहे. भाजपचा डीएनए ओबीसींचा आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटले होते. त्यामुळे राज्यातील ओबीसींनी त्यांना भरघोस मत देऊन सत्तेवर बसविले. त्यामुळे आता ओबीसींसोबत विश्वासघात करू नये. मनोज जरांगे यांच्या पाठीमागे शरद पवार यांच्यासोबतच राज्यातील सत्तेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील आतून हात आहे. त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही. मायक्रो समाजातील व्यक्ती देवेंद फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे. म्हणून शिंदे यांची आग झाली असून ते फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी, सरकारला अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी ते आतून काम करत असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.
एसआयटीचे काय झाले ?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सरकारने एसआयटी चौकशी केली. मात्र, त्या चौकशीचे पुढे काय झाले? हे सरकारने सांगावे. जरांगे यांच्यावर कारवाई का केली जात नाही, हे सरकारने सांगावे. एकतर सरकार दिशाभूल करीत आहे किंवा मनोज जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करत आहे.
मंडल नव्हे बंडल यात्रा..!
शरद पवार यांच्यासारखा धूर्त राजकारणी राज्यात दुसरा नाही. मंडल आयोगाचे श्रेय त्यांना देता येणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात त्यांनी मनोज जरांगे यांना पुढे केले आहे. जरांगे यांच्या पाठीमागे तेच आहेत. आता ते शरद पवार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंडल यात्रा काढण्याचे ढोंग करीत आहे. त्यांची ही मंडल यात्रा नसून बंडल यात्रा आहे, असा टोला नवनाथ वाघमारे यांनी यावेळी केला.
तर ओबीसींची संघर्ष यात्रा काढणार
जरांगेच्या आंदोलनाला पायघड्या घालू नका. त्यांचे ऐकून तुम्ही जर ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसाल तर आम्ही सुद्धा माळेगावच्या खंडोबापासून किंवा मातृतीर्थ सिंदखेडराजापासून संघर्ष यात्रा काढणार आहे. ती यात्रा राज्य सरकारला झेपणारी नाही. याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारला फटका बसेल. त्यामुळे सरकारने ओबीसींना न्याय देण्याचे काम करावे, असे नवनाथ वाघमारे यावेळी म्हणाले.
