करमाड : नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून मशाल ज्योत घेऊन गोळेगाव-गदाना (ता. खुलताबाद) येथे जाणाऱ्या भाविकांना पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रेड अॅपल फर्निचरसमोर शनिवारी (ता. १०) रात्री सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत अक्षय राजपूत, अमोल आवटे आणि गोरख मस्कर या तिघांचा मृत्यू झाला, तर शुभम आदाने गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आयशरचालक वाहनासह पसार झाला.
धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रेड अॅपल फर्निचरसमोर दुर्घटना, आयशरचालक पसार

करमाड : नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून मशाल ज्योत घेऊन गोळेगाव-गदाना (ता. खुलताबाद) येथे जाणाऱ्या भाविकांना पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रेड अॅपल फर्निचरसमोर शनिवारी (ता. १०) रात्री सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत अक्षय राजपूत, अमोल आवटे आणि गोरख मस्कर या तिघांचा मृत्यू झाला, तर शुभम आदाने गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आयशरचालक वाहनासह पसार झाला.

या अपघातात अक्षय बिमलसिंग राजपूत (वय २८, रा. जाकरवाडी, ता. खुलताबाद), अमोल अशोक आवटे (वय ३०, रा. गदाना, ता. खुलताबाद) आणि गोरख रावसाहेब मस्कर (वय ३०, रा. गदाना, ता. खुलताबाद) यांचा मृत्यू झाला. शुभम नारायण आदाने (वय २०, रा. चिमणापूरवाडी, ता. खुलताबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पाठीमागून ट्रकची जोरदार धडक
करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त काही भाविक तुळजापूर येथून पायी मशाल ज्योत घेऊन गोळेगाव-गदाना येथे जात होते. मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी काही जण दुचाकीवरून त्यांच्या मागे जात होते. शनिवारी रात्री हे भाविक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना रेड अॅपल फर्निचरसमोर पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीवरील भाविकांसह पायी मशाल ज्योत घेऊन जाणारे भाविकही अपघातात सापडले. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर शुभम आदाने गंभीर जखमी झाले.
पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर, जमादार जयसिंह राठोड, अमोल गीते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर आणि चिकलठाणा येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अक्षय राजपूत, अमोल आवटे आणि गोरख मस्कर यांना तपासून मृत घोषित केले. शुभम आदाने यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि जमादार जयसिंह नागलोत पुढील तपास करीत आहेत.