Dhamma Melava in Akola: आगामी विधानसभा निवडणुकीनंतर इमर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धोका आहे, हे ओबीसींनी लक्षात घ्यावे, असे संकेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन -आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी रात्री येथे दिले.
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर इमर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धोका आहे, हे ओबीसींनी लक्षात घ्यावे, असे संकेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन -आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी रात्री येथे दिले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्यावतीने अकोल्यातली क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा कळीचा मुद्दा राहणार असून ही निवडणूक -आरक्षणाच्या अवतीभवती फिरणार असल्याचे सांगत या निवडणुकीनंतर शिक्षण व नोकरीतील आरक्षणही जाणार हे ओबीसींनी लक्षात घेतले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले. विधानसभेतही ओबीसींचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरू असून जोपर्यंत जनगणनेची आकडेवारी येत नाही, तोपर्यंत ओबीसींचे शिक्षण व नोकरीतील आरक्षण थांबविण्याचा ठराव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे धर्म धोक्यात आला नसून, आरक्षण धोक्यात आले आहे, हे ओबीसींनी समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.
आरक्षण वाचले पाहिजे यासाठी -अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसींनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, यू. जी. बोराडे, माजी आमदार सय्यद नातीकोद्दीन खतिब, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, नीलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गवई, संचालन नंदकुमार डोंगरे यांनी, तर आभारप्रदर्शन विजय जाधव यांनी केले. या धम्म मेळाव्याला भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहु आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण केवळ शिष्यवृत्तीचा प्रश्न नाही; राज्यघटनेचा गाभा आहे !
आरक्षण हा केवळ शिष्यवृत्ती आणि फ्रिशीपचा प्रश्न नाही, तर आरक्षण हा राज्यघटनेचा गाभा आहे, असे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. आरक्षण ही एक व्यवस्था असून मागास घटकांच्या जगण्याचे साधन आहे, असे ते म्हणाले.
हमी भावाप्रमाणे व्यापाऱ्याने शेतमालाची खरेदी केली पाहिजे !
शासन जोपर्यंत हस्तक्षेप हस्तक्षेप करीत नाही, तोपर्यंत व्यापारी नियंत्रणात येत नसल्याचे सांगत, हमी भावाप्रमाणे शेतमाल व्यापायांनी घेतला पाहिजे, नाही घेतला तर पाच वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, हा कायदा आतापर्यंत का करण्यात आला नाही, असा प्रश्नही अॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला.